मे २०१४ मध्ये झालेल्या १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविले.या यशाने संपूर्ण संघपरिवार हुरळून गेला आहे.आतापर्यंत भारतामध्ये सुरु असलेला संघर्ष देशातील संख्येने जास्त असलेल्या जनतेवर लादण्यात आलेली सामाजिक आणि आर्थिक असमानता विरुद्ध संख्येने अल्प परंतु साधनसामुग्रीने प्रबळ असलेल्या जातींचे जीवनाच्या सर्व क्षेत्रातील वर्चस्व या अक्षावर केंद्रित होता.नरेंद्र मोदी आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या रा.स्व.संघाने संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या ' सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध संघर्ष ' हा मुद्दा झाकोळून टाकून ' विकासासाठी मोदी ' या मुद्दयावर भारतीय समाजाचे ध्रुवीकरण केले आहे.असे ध्रुवीकरण होणे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.
कोणत्याही देशातील जनतेसाठी विकासाचा मुद्दा हा भुरळ घालणारा असतो.यामुळे समाजातील सर्व प्रकारचे घटक विकासाच्या मुद्दयावर हुरळून जातात आणि सारासार विवेक गमावून बसतात.भारतीयांचेही असेच झाले आहे.आता खरोखरीच " अच्छे दिन " येणार या दिवास्वप्नात बहुसंख्य भारतीय दंग झाले आहेत. विकासाचा मुद्दा हा भुरळ घालणारा असला तरी हा अत्यंत फसवा आणि मोघम स्वरूपाचा मुद्दा आहे.यामुळेच सरकार स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही भाजप सरकारला कोणताही ठोस आराखडा जनतेपुढे ठेवता आलेला नाही.
भारतीय जनता पक्ष अंतर्विरोधाने ग्रस्त असलेल्या लोकांचा पक्ष आहे. सद्यस्थितीत भाजपमध्ये तीन प्रकारचे अंतर्विरोधी गट आहेत. १ ) शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे भले करू इच्छिणारा गट.हा गट धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकू शकेल इतका प्रबळ नाही.२ )भांडवलदारांचे हित जपणारा भांडवलदार धार्जिणा गट.यांचा स्वतंत्र अजेंडा असून हा गट संपूर्ण खाजगीकरणाचा समर्थक आहे.धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकू शकेल इतकी यांची शक्ती आहे. 3. धार्मिक कट्टरतावादी गट.हा गट प्रखर हिंदुत्वाचा समर्थक आहे.हिंदुराष्ट्र निर्माण करणे हे यांचे ध्येय्य आहे.मात्र भांडवलदार धार्जिण्या गटापेक्षा हा गट कमजोर आहे.